Tuesday, February 9, 2010

रिडायल मेमरी

मोबाईल म्हणजे
माणसं नसलेल्या गर्दीची जागा
जिथे स्क्रोल डाऊन करताना
भेटतात सगळे
सगळा खेळ संपर्काचा
जो अडकलाय आकड्यात
आणि रोज सेव्ह होतात
मेसेजेस
ड्राफ़्टबॊक्समध्ये
जसे अनेक आवंढे असतात ना
साचलेले
ते अचानक साचु लागतात
निर्विकारपणे
सेन्ड न होता
प्रत्येक स्टोर झालेल्या
आठवणीचा इतिहास असतो
तारखेसकट
नसतो फ़क्त
चेहरा
काळाच्या ओघात
फ़िलॊसॊफ़ीनेसुध्दा
टाकलेली असते
कात
तरीही
रिडायल करण्याचा
मोह होतोच
पण तोपर्यंत
नंबरसकट बदललेली असते
व्यक्ती
आणि आपण
उगाचंच काहीतरी शोधत राहतो
डिलिट झालेल्या अनेक
रिसीव्हड कॊल्सचे
संवाद!




1 comment: