Sunday, December 12, 2010

भिंत

३१ ऒक्टोबरच्या मध्यरात्री

लिविंग रुममधल्या

कागदाच्या ढिगा-यात

स्वत:लाच कवटाळुन बसलेली

विवस्त्रपणे

मीरा.....!!



जणू कागदांसारखंच फ़ाटण्यासाठी



मी कागदांचा पसारा आवरताना

लक्षात आलं

कि...

तिने स्वत:च्या त्वचेवर

शाई

ओतली होती

अंगभर..!



माझी इच्छा नसुनही

मी

तिला

स्पर्श केला.....

आणि ती...

बिलगली

त्याच अवस्थेत

एखाद्या शाईपेनासारखी



कदाचित तिला...

माझ्या मनात उतरायचं होतं....

कथा बनुन

कदाचित तिला

काहीतरी गिरवायचं होतं

ओरबाडुन

कदाचित तिला

व्यक्त व्हायचं होतं

कदाचित

विवस्त्र होऊन..!



पण...कदाचित तिला

हे ठावुक नव्हतंच...कि...

दर्जा

शाईचा नसुन

विचारांचा असतो

शाई संपल्यावरही

विचारथांबत नाही..!



मीरा....

तु भिंत असतीस....तर

निदान तुझ्यावर

डोकं टेकायला हरकत नव्हती

कारण भिंतीवर

गिरवताना

कोरताना

खोल शिरता तरी येतं



तुझ्यावर तुलाच

गिरवण्याची

कल्पनासुध्दाआलेली

मला....



पण आता...

कमिट्मेंट

भिंतीशी आहे...

मी तिला नाही टाळु शकत...

जे तुला

माझ्याबाबतीत

जमलं..!!!!



जाताना

फ़क्त

शाई पुसण्याचा

प्रयत्न कर

जबाबदारीने...

कारण ती सुकल्यावर

डाग

उरतात

ते मनातंच

बरे..!

नाहीतर तुझ्या कृष्णाला

तुझ्यात खोल शिरुन

नाही लिहता येणार

अंधारातील

भगवदगीता..............................................................


ब्लॆक मुव्हमेंट

विल्सन कॊलेजच्या

३०१ रुम नंबरच्या

क्लासरुममध्ये...

लेक्चर्स अद्याप सुरु आहेत


दिवान मॆडमनी शिकवलेला

मॆक्स वेबर...

सोशिऒलॊजितला

कळलाच नाही....

एमिल डर्कनहेम

कळलाच नाही...

कार्ल मार्क्स

कळलाच नाही....

सिविल वॊर

कळलं नाही


ब्लॆक मुव्हमेंट

कळली...!!


पण...

अनघाच्या काजळाचीच..!!


त्या ३०१ मधल्या बेंचेसवर

मी

बरंच काही गिरवुन ठेवलेलं

बरंच काही कोरुन ठेवलेलं

बहुदा प्रश्नंच

कारण...

उत्तरांवर कायमच

ओझं असतं

प्रश्नांचं...!

उत्तरांखाली प्रश्न आल्यावर

संशय निर्माण होतो....


गॆरसमज आणि संशयाची..मॆत्री

न तुटणारीच असते

तुटते ती

फ़क्त

माणसाची माणसाशी


म्हणुन

मी

निरुत्तर झालो

तिच्याच नकळत

आणि

गिरवत राह्यचो पेनाची शाई

३०१ च्या बेंचवर

तिचचं

काजळ समजुन.........


अनघा

माणसाची किंमत ठरवताना

मीअनेकदा विसरुनंच जायचो

कि

आपल्यावरही प्राईजटॆग लावणारे

आहेत बरेच..!

बार्गेनिंगचा विचार जरी आला

तरी

तो कुणाशी करावा आणि कशाचा..?

नेमका..!!

बार्टर सिस्टीमप्रमाणे

भावनेच्या बद्ल्यात

भावनाही मिळायला हरकत नव्हती

तसंच..

ओळखीच्या बदल्यात ओळख...

तसंच सुरुवात/शेवटं...सत्य/स्वप्न...

इत्यादी वगॆरे...

अनघाने दिलं

ते

कन्फ़्युजन.......

मनीप्लांटच्या वेलीप्रमाणे विळखा घालणारं.....................

मी ऎकलंय की...

मनीप्लांट दुस-यांच चोरून

आपल्या कुंडीत लावलं जातं...

तिच्या सोबतच्या मुमेंटसना

रोज नव्याने पालवी फ़ुटते

तीच

तीच

तीच

जुनी..! जुनी..!

पण.....विळखा घालणारी...!!

शाई

पिकासोचा ब्लु एरा पाहताना

आज कधी नव्हे तितका

सिरीयस झालो.....

त्याच्या सेल्फ़ पोर्ट्रेटमध्ये

मी

स्वत:हुन केव्हा अडकलो

ते कळलंच नाही....

हो पण...

मी मात्र स्वत:ला न्याहळताना

स्वत:लाच पाहीलं

नव्याने...!

साला...

मलाही आणावसा वाटतो

पिंक एरा !

ब्ल्यु एरा !

मध्येच वाटतं की शब्दांना जमेल का

दम्वाझेलचं रुप घ्यायला..?

कदाचित शब्दांना टोकदारपणा

असावा

पण...

क्युबिजम इतका नाही !

गर्निकामधला पॊलिटीकल अप्रोच

आपल्या मनुवादी लिखाणाला येईल का..?

तो शांततेचा कबुतरही पिकासोचाचं

आंब्रोज वोलार्ड सारखा चित्रांचा दलाल

जर

शब्दांचाही

असता

तर...

हातातल्या पेनाला

कुंचला मानायला

हरकत नव्हती एकवेळ......कदाचित.....

पेनाच्या गिरवण्यास

कुंचल्याची ग्रेस नसावीच बहुतेक

नाहीतर

आभाळ लिहण्यातला व रंगविण्याचा

फ़रक कळलाच नसता...

शेवटी रंगसंगतीत विरघळण्याचं

भाग्य

शाईला नसतंच

शाई फ़क्त वाहत असते

लमाण

न कळलेल्या अर्थांचं

उच्चारांची

वाट बघत....