Friday, April 9, 2010

चकवा

स्वत: हसावे
अन हसवावे
अश्रुंना छेडत थोडे
क्षणांत डोळ्यांतुन फ़सवावे
खिदळत पळवावे घोडे

खिन्न इथेही असतो
इथल्या श्वासांमधला काळ
शब्दांमुळे उलगडते शुभ्र
ओठांमधली माळ

हास्याचे हे पुण्य आगळे
अश्रुंना कळले नाही
सावध राहुनी नजरेतुन
ते उगाच गळले नाही

Friday, April 2, 2010

काजवा

सहज अचानक गडद दिसावे
क्षणी काजवा व्हावे
आणि चांदण्या हलतानाही
किंचित न्याहळत जावे...!

हलणार्या त्या ठिपक्यांची
रांगोळी एक निराळी
फ़ाद्यांवरुनी सजताना
अलगद पाने देती टाळी

ताल बावरा चमचमण्याचा
पाहुन थमतो वारा
आभाळातुन लुकलुकतो
मोहक शुक्राचाही तारा

नक्षत्रांची अदा अनोखी
जमते धरतीवरही
क्षितीजालाही टाळुन नकळत
करतो चंद्र पहारा !