Sunday, May 15, 2011

शशि रोडकर



फ़िरणा-या चाकांचं भलतंच ओबसेशन बाळगणारा
आपलाच
शशि रोडकर.....
सुसाट निघतो
गाड्यांच्या एकेरी दिशेत
बेभान धावत
न मरणाचं भय
न जगण्याची
कसलीच चिंता
त्याला त्याचीच..!

त्याच्याच सारखे दिसणारे
त्याचेच इतरही
पळतात अधुन मधुन
कधी उकिरड्याभोवती
कधी स्वत:भोवती
कधी उगाचंच
फ़िकिर नाही
तर फ़किरी करत...
फ़ुटपाथपासुन
रस्त्यावर..!

शशिच्या रात्रीचा दिवस होतो
तो असा....
ब-याचदा असंच वाटतं की...
गाड्यांच्या हेडलाईटमध्ये त्याने
शोधला असावा त्याचाच
सुर्य
चंद्र
ग्रहमाला
कदाचित सुसाट निघणा-या टॆक्सीचा
मिणमिणता
आतला दिवा
त्याला
धुमकेतुही वाटत असावा...
म्हणुन रोज त्याच्या नशिबी
असतो
असाच
उल्कापात....
रस्त्यावर
एकेरी रेषेतला
शशि रोडकरचा..
गाड्यांपुढुन
गाड्यांमागे........

Tuesday, May 3, 2011

लास्ट सुसाईड...!



"......माझ्या मृत्युला कुणीही जबाबदार नसणार...! "

हे वाक्य आजपर्यंत रेंगाळत राहीले
अनाऊंस न झालेल्या निकालासारखे
तरीही स्वत:लाही न जुमानता
व्यक्त होण्यासाठी काहीतरी शोधत होतो
तसा बोटांना ह्या वाक्याचा सराव अनेकदा झालेला
तिथल्या अक्षरांच्या वळणाचीच लय हालचालींतुन कळत होती
यंदा मुठ आवळुन त्यांना त्यांच्याच मिठीत घेतलं
आणि सुरु झाली शोधा शोध
शेवटचा निरोप घेण्या-या
कुणाची तरी....
कुणाला सांगावं..?
काय सांगावं..?
का सांगावं.....
ह्या प्रश्नांनी मला
माझ्याच अडगळीत टाकलं
जिथे विद्रुप होऊन एकटीच
हुंदके देत बसली होती
मिरा..!

तिने मला खेचत आणुन फ़ेकलं
जमिनीवर
जिथे मी मलाच दिसलो
जिवंत..!
काळाच्या पुढे गेलेला
जिवंत..!
जो अद्याप शोधत होता
मोक्षाचं दार...
आणि मिरा स्फ़ुंदत होती
स्वत:चं केशवपन करुन
मला अग्नि द्यायला...
जो अद्याप मेलेला नव्हता...
त्याच्यासाठी...!

माझ्या अंत्यसंस्काराच्या विधीत
मिरा
सध्या पारंगत झालेली आहे
किरवंतासारखी

फ़क्त माझ्या मृत्युसाठी
तिच्याच आभासाला
केतकीचं शरीर मिळावं

कदाचित
तेव्हाच मार्ग सापडेल
श्रध्दांजलीचा..!
जेव्हा दरवळेल मिरा...
केतकीसारखी

किंचित जास्त
माझ्या मृत्युनंतर....!

Wednesday, April 13, 2011

बंड्या

हि तेव्हाची गोष्ट आहे
जेव्हा बंड्या कॊलेजमध्ये असतांना
त्याला तिचं नाव नव्हतं ठावुक
पण...ठावुक होतं
पुढे काहीतरी होणार आहे..!

आरशासमोर केसांचे
अगणित भांग पाडलेले
आरशानेच सहन केले..त्याचे..!!!
काय करणार..!?
स्वत:लाच कंव्हिंस करायचं होत ना..
(हिरो)..म्हणुन...
हि तेव्हाची गोष्ट आहे
जेव्हा घरी असतांना
खोबरेल तेलाने हेयर जेलची जागा घेतलेली नव्हती
पण...ठावुक होतं
पुढे काहीतरी होणार आहे..!

तिचं फ़ुटलेलं हसु पाहताना
आपण मात्र आवरतं घेतो हसु
कारण तिच्या गालांच कॊम्प्लेक्षन असतं
तर आपल्या गालांवर मुरुमं
बंड्याने त्याच्या मैत्रिणींच्या सल्ल्यांवरुन
घरगुती उपाय म्हणुन
थोबाडावर अनेक मिश्र डाळींच्या पिठाचे
लेप लावलेले
तरीही तिथे अद्याप डाळ शिजलेली नव्हती
हि तेव्हाची गोष्ट आहे
बंड्याची त्वचा उजळलेली
फ़क्त भाग्यावर लेप चढायचा शिल्लक होता
पण...ठावुक होतं
पुढे काहीतरी होणार आहे..!


तिच्या घरात ग्रेट डेन डॊग होता
बंड्याच्या घरात ढेकुण
तिला स्वत:चं बेडरुम होतं
बंड्याला खाटेखालची मोकळी जागा
तिची आई झोपताना कपाळावर किस करायची
बंड्याला पेकटात लाथ मिळायची
तिचा एसी बोटांनी ऒन व्हायचा
बंड्याच्या टेबल फ़ॆनने सध्या त्याला पाहणंच टाळलेलं
तिची पहाट डिजिट्ल क्लॊकने व्हायची
बंड्याची अर्वाच्य शिव्यांनी
तिच्या टॊईलेटला शुभ्र टाईल्स होत्या
आणि इथल्या भिंतींवर मॊर्डन आर्ट
हि तेव्हाची गोष्ट आहे
जेव्हा मशेरीची टुथपेस्ट झालेली नव्हती
पण...ठावुक होतं
पुढे काहीतरी होणार आहे..!

तिची कुठलीतरी सेकंड हॆंड कार होती
बंड्याचा ट्रेनचा सेकंड क्लास
ती कॊलेजमध्ये शिरताना सिक्युरीटीने आयडी कधी चेक केलाच नाही
बंड्या मात्र सदैव संशयित
तिच्या नावासकट तिच्या परफ़्युमचीसुध्दा ओळख होती
बंड्या अजुनही प्रॊक्सीवर जगत होता
तिच्या असण्याने वातावरण जिवंत व्हायचं
आणि बंड्या जिथे जिथे जाईल तिथे कर्फ़्यु
हि तेव्हाची गोष्ट आहे
जेव्हा हातांने लिहलेल्या कवितांचे
एसएमएस झालेले नव्हते
पण...ठावुक होतं
पुढे काहीतरी होणार आहे..!

to be continued...............

Thursday, March 31, 2011

ह्युमन रिसोर्स

रोज उद्याची स्वप्ने घेऊन जनरेशन मिटते डोळे
उरलेल्या इच्छांचे टाकुन देतोही कोरे गोळे
रिकामटेकडा वॊलेटसुध्दा खिशात गुपचुप पडुन असतो
आणि उगाच तोंडातुन फ़ेकतो क्रायसिसचे खोटे बोळे

पदवी घेऊन लाख मिरवली छाती इथल्या सगळ्यांनी
लांब चोचीतले छोटे मासे धरले इथल्या बगळ्यांनी
मेंदु झिजला अन झिजल्याही बाता मैत्रिणींच्या पुढे
फ़ॊर्म भरुन मग पद्व्युत्तरचा मार्ग पकडला बगळ्यांनी

इंप्रेशनच्या नादी लागुन डेफ़िनेशन फ़सल्या रे
एज्युकेशनच्या मिरवणुकीच्या एक्झिबिशन कसल्या रे
पॊवर्टीचा किळस आम्हां पावलोपावली जाणवतो
रुरल डेव्हलपमेंटच्या चर्चा करतो का घरबसल्या रे

खेदही असतो वेधही असतो अन असतो एकाकीपणा
दोन वेळचे गिळुन जेवण चिंता असते बाकी कुणा..?
फ़ुटपाथावर भिक मागते नवी ह्युमन रिसोर्स इथे
इकोनॊमिक्सच्या टेंशनमध्ये फ़सला अपुला देश उणा

मंत्र टाळुनी तंत्र आणले यंत्र बनविल्या सहज पिढ्या
सर्व्हायव्हलने अजुन बनविल्या फ़्रस्ट्रेशनच्या उंच शिड्या
यंग असुनही अंग राबते बोंझायसम इच्छेपुरते
मग, इगोने सांगितले मारा पाण्यावरती लांब उड्या

Tuesday, March 29, 2011

तनाचे श्लोक

मना कल्पना पापबुध्दी नको रे
नशा एवढी त्यात शुध्दी नको रे
असु बॆचलर आम्ही अमुचेही
रिलेशनचीही उगीच रद्दी नको रे

सदाचार हा थोर सांडु नये तो
तरी मादीला नर सांगुन नेतो
बिचारे इथे एकटे प्रेमवीर
होऊन घट्ट वोडक्यानेही धीर घेतो

नको रे मना क्रोध हा खेदकारी
इथे तापतेही बिछान्यात स्वारी
क्षणार्धात कन्फ़्युजनही अंगिकारु
किती संपले अवघे नका हो विचारु

जगी सर्व सुखी असा कोण आहे
मादीला शिकवणरा असा द्रोण आहे
तिला नरबळींचा असे छंद निराळा
कुठल्या बिळात कुठला उंदीर आहे

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
जुना प्रेमवीर नव्यासंग आहे
त्यालाच काळजी मादीची थोडीफ़ार
बदलले विचार बदलला आकार

देहे त्यागिता किर्ती मागे उरावी
नि:शब्द मनेही वांझोटी स्मरावी
इथे आरशात हसे अपराधी
नराला कशीही मिळे रोज मादी

घडें भोगणे सर्वही कर्मयोगे
नराने मादीला पटवले प्रयोगे
बुडातुन तरी न असा माज जाई
जुन्या प्रेमवीरास अल्कोहोलची अंगाई...!!




Monday, March 28, 2011

बार्टर सिस्टीम

नवा ह्युमन अप्रोच,त्यावर इलॊजिकल डिबेट
होऊन इगोशी समेट,उरते सर्व्हायव्हल हॆंडीकॆप
इथे दिन रात....

झाली जुनी रॆट रेस,सध्या गिधाडांशीच भेट
एसी मध्ये गारगार,करते अवघी कॊर्पोरेट
देऊन इंटरनेट....

मांड्यावरती स्टॊकिंग्ज,हायलाईटेड केसांवर शिंग
करे पुरुषी डोळ्यांचेही भिंग,वळणांतुन प्रमोशन घेत
सोडुन हास्यस्मित....

कशी बघता बघता,आली सिस्टीम बार्टर
होऊन म्युच्युअली कमिट,चालतो सेक्स सारा
मानुन कल्चर....

ट्रेंड नागवेपणाचा,सांभाळतो ग्रुपिजम
हातवा-यांचे जेश्चर, सांगे अर्थ लपलेला
झेलुन इंसल्ट....

एकमेकांची चाटुन,थुंकी घशात गिळावी
नवी थिअरी जगाची, नवा मॊरल सपोर्ट
स्वत:तही दिशाहीन..!

Monday, February 7, 2011

टिळक ब्रीज...

भाज्यांच्या पुंजक्यात
पहाटे
मग्न असलेला
टिळक ब्रीजचा रस्ता
किंचित पहावा
रात्रीसुध्दा....!
रहदारीच्या आडोशातील
फ़ुटपाथावर
निजलेला असतो....असतात....
मनुष्यप्राणी रांगेत
अंग टाकता येईल तेवढ्याच भागात

आपण मात्र
पाय
सांभाळुन टाकत असतो
काय करणार..?
कातडीवरचं सगळंच ब्रॆंडेड
आणि फ़ुटपाथवरल्यांची
कातडी ब्रॆंडेड

रॆशनलिस्ट म्हणता म्हणता
रेसिजम निमुटपणे चालते
कडेने
सगळ पहात......उत्क्रांतीच्या विधीसकट
तेव्हा
आठवतो....मटेरियलिजम..!

आणि ब्रीज संपेपर्यंत
तो फ़क्त
आठवतो
आठवत राहतो
अनेकदा
टिळक ब्रीजवर
सतत.....
भाज्यांच्या पुंजक्यात
पहाटे.

Wednesday, January 19, 2011

पेन फ़क्त २ रुपये..!

पेन फ़क्त २ रुपये..!

हातात जीर्ण झोळी घेऊन
रोज एक म्हातारा
नाक्यावरल्या फ़ुटपाथावर फ़िरत असतो..
स्वत:शीच बडबडत
की...
पेन फ़क्त २ रुपये..!!

चहा पिणा-या
घोळक्यासमोर येऊन
थांबतो
अगतिकपणे आजुबाजुला बघत
आवळलेल्या मुठीमध्ये
असंख्य
पेन घेऊन
पण...
त्याचेच..!

पेन फ़क्त २ रुपये..!!
प्लीज...
असं तो किमान
चार पाच वेळा सांगतो
पण...
मुलींना आपादमस्तक न्याहळताना
फ़िरलेली मान
विस्फ़ारलेले डोळे
त्याला नसतील पहात कदाचित
कान मात्र
ठरवुन बहीरे झालेले पाहीलेत
एकाचवेळी अनेकांचे...

तोही किंचित हसतो
सगळ्यांसोबत
आणि पुन्हा सांगतो की...
पेन फ़क्त २ रुपये..!!
प्लीज...
धिस इज फ़ोर कॆंसर पेशंट्स...फ़ंड...

आणि पुन्हा मागवितात
चहा
अनेकजण अनेकांसाठी
साधा...स्पेशल...
पुन्हा आपल्या मुठीत
चहाचा ग्लास
बोटांत सिगरेट्स
पुन्हा...
मुलींना आपादमस्तक न्याहळताना
फ़िरलेली मान
विस्फ़ारलेले डोळे
त्याला नसतील पहात कदाचित
त्याचेच
पेन
घेऊन जाताना
कान मात्र
ठरवुन बहीरे झालेले पाहीलेत
एकाचवेळी अनेकांचे...

ज्यांनी ऎकलेलं असतं

पेन फ़क्त २ रुपये..!!
प्लीज...


Friday, January 14, 2011

मर्यादा आल्याच......

घर..!

घर
म्हटलं...की
मर्यादा आल्याच

चार भिंतींच्या

ज्या.....
काहींच्या जवळ असतात
काहींच्या फ़क्त दूर

काही झावळ्यांच्या
पत्र्यांच्या
विटांच्या
सिमेंटच्या
कौंक्रीटच्या
चिरेबंदी दगडांच्या
द्न्यानाच्या
तत्वद्न्यानाच्या
वय वाढलेल्या
अद्न्यानाच्या
त्वचेपासुन
त्यावरील ब्रॆंडच्याही
भिंती आल्याच ..!!
घर...म्हंटलं
की....


घर..!

घर
म्हटलं...की
मर्यादा आल्याच
गळणा-या छताच्या
पापुद्रे निघालेल्या रंगाच्या
अडगळीच्या
अडगळीतल्या धुळीच्या
तिथेच संसार थाटलेल्या किड्यांच्या
ट्युबलाईट ते साठ व्होल्टच्या बल्बच्या
काचा फ़ुटलेल्या खिडक्यांच्या
ब्लॆक एंड व्हाईट टिव्हीच्या
टेबल फ़ॆनच्या
गळणा-या घामाच्या
समाधानाच्या
शेजा-यांच्या
गोंगाटाच्या
पसा-याच्या
देव्हा-यातल्या देवांच्या
माणसामधील माणुसकीच्या
आकारापासुन विकारांच्या
आकृती पासुन विकृतीच्या

जन्माच्या
ते जगण्याच्या
स्फ़ुर्तीच्या
वासनापुर्तीच्या
येणा-या प्रत्येक पिढीच्या
सुरुवातीपासुन
शेवटाच्या
मर्यादा आल्याच

घर..!
म्हंटलं की...

Thursday, January 13, 2011

Contradiction...

(रंगमंचावर देवयानी एकटीच पाय दुमडुन बसलेली आहे आणि मीरा शेजारी लाईटबॆटनकडे मान करुन.)

देवयानी :प्रयोग...

मीरा :हम्म...experiment !

देवयानी :आपण प्रयोग का करतो..?

मीरा :निष्कर्ष शोधायला

देवयानी :निष्कर्ष..? कशाचा...

मीरा :तुर्तास तरी तु तुझ्या भुमिकेचा....

देवयानी :माझी...भुमिका...माझी खरंच कसली भुमिका आहे का..?

मीरा :हा प्रश्न भुमिकेला नव्हे तर...व्यक्तीला पडायला हवा...

देवयानी :मीरा...पण माझं काहीच चुकलेलं नाहीये...

मीरा :अगदी हेच realization...मेक अपच्या थराखालच्या त्वचेला झालं असतं तर..मी भेटलेच नसते तुला....

देवयानी :मी दरवेळी ग्रीनरुम बाहेर कचराकुंडीसारखीच निश्चल उभी असते....दरवाजाबाहेर वाट बघत....

मीरा :देवयानी रंग फ़िके पडतात...

देवयानी :भावना...?

मीरा :रंगांना नसुन वृत्तीला असते.!

देवयानी :मला का कुणीच समजुन घेत नाही....

मीरा :स्वत:चं सांत्वन करायला शिक.

देवयानी :नाही जमणार मला...

मीरा :मग तु अभिनय कर..

देवयानी :नाही जमणार मला...

मीरा :तर मग रडण्याचा प्रयत्न कर...रुदालीसारखा...

देवयानी :जमेल मला..?

मीरा :पुर्वीच्या देवयानीच्या वाट्यातलंही रड...

देवयानी :(किंचित वळुन)..कदाचित आता जमेल...मला..!!!

मीरा :देवयानी ह्या वरच्या उजेडाचा काय अर्थ असेल..?

देवयानी :(गुडघ्यांत मान टाकुन) नाही ठावुक...

मीरा :उजेडाचा स्वार्थ काय..?

देवयानी :मार्ग दाखवणे.!

मीरा :तर अंधाराचा नाद का..? अंधारातल्या गर्दीत सगळेच एकटे असतात....भुतकाळाला घेऊन..!!

देवयानी :................................................................................................................................................

Sunday, January 9, 2011

रिएक्शन

कथा कवितांच्या पसा-यांत
मीराला
काहीतरी सापडलं होतं
यंदा...
फ़क्त मला न दिसणारं..!

बेडवरल्या कागदांना तिने
सारलं मातीसारखं
ईकडे तिकडे
आणि हात टेकुन ती बेडवर
सुन्नपणे पाहु लागली...
कदाचित......
तिलाच काहीतरी सापडलं होतं

मी सोडुन ..!

तिने तिची मान आता कलती केली होती
निश्चयाने

तिच्या डोळ्यांतला
एकेक थेंब
बघ्यांप्रमाणे गर्दी करु लागला
रिएक्शनशिवाय

पण... ओठांमधल्या शब्दांनी
एकमेकांना धीर देऊन
मीराला
बोलायला भाग पाडलंच
की....
"इथे कुणाच्यातरी पाठीवरच्या
तीळाचा ठ्सा आहे..."


हे ऎकुन मात्र
माझ्या अश्रुंनी नाही घेतली
बघ्यांची भुमिका

मीराने त्या ठश्याला
अलगद
स्पर्श केला
आणि माझ्या डोळ्यांत पाहीलं
त्या काळ्या तीळाची
डेप्थ
तिला माझ्या नजरेत दिसली
आणि नकळतंच
त्या भयाण शांततेत
दरवळु लागला
पुन्हा
केतकीचा
गंध...
विषारी वायुसारखा...
जो
फ़क्त कळत नव्हता


मीराला
मीरेचाच..!